इस्तंबूलला भूकंपाचे धक्के   

इस्तंबूल : तुर्कीतील इस्तंबूल शहरात बुधवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या भूकंपाची तीव्रता ६.२ इतकी असून, यामुळे कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आलेले नाही, परंतु अलीकडच्या काळात इस्तंबूलमध्ये जाणवलेल्या या सर्वात तीव्र भूकंपामुळे शहरातील सुमारे १.६ कोटी रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
 
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (यूएसजीएस) नुसार, भूकंपाचे केंद्र इस्तंबूलच्या नैऋत्येस सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मारमारा समुद्रात १० किलोमीटर खोलीवर होते. इस्तंबूलच्या शेजारील प्रांतांमध्येही याचे धक्के जाणवले.
 
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे घाबरलेल्या नागरिकांनी त्यांच्या घरांच्या खिडक्यांमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला.  यामध्ये २३६ जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शक्तिशाली भूकंपामुळे इमारती कोसळण्याच्या भीतीने, नागरिकांनी त्यांच्या मोटारी, उद्याने आणि इतर मोकळ्या जागांमध्ये लावलेल्या तंबूंमध्ये रात्र काढली. तुर्कीच्या आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सी एएफएडीने सांगितले, की या भूकंपानंतर सुमारे १८४ भूकंपाचे धक्के जाणवले, त्यापैकी सात धक्के ४ किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे होते. 
 

Related Articles